Bhishma School
of Sanskar
विश्व संस्कारविद्या परिषद
चांगले संस्कार हे यशस्वी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे पाथेय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारांना अतोनात महत्त्व दिले गेले आहे. आर्य म्हणजे सुसंस्कारित व्यक्ती आणि आर्य समाज म्हणजे सुसंस्कारित समाज... विश्वातील सर्व प्रकारचे ज्ञान, चांगले विचार, सद्गुण, नैतिक मूल्ये सतत आपल्या कानावर पडोत आणि त्यानुसार सर्वांचे आचरण घडो अशी प्रार्थना आहे. II एतद्देशप्रसूतस्य सकाशादजन्मनः स्वं स्वं चरित्र शिक्षरेन् पृथिव्यां सर्वमानवाः II संस्कार म्हणजे नक्की काय ? सद्गुणी आचरणासाठी प्रवृत्त करणारे आग्रही विचार आणि परंपरा म्हणजे संस्कार. भारतीय संस्कृतीमध्ये अगदी जन्मापूर्वीपासून बालकावर संस्कार कसे करावेत याचे शास्त्रशुद्ध विज्ञान विकसित झाले होते. विवाह समयीच नव्याने जन्माला येणाऱ्या संततीबाबत विचार केला होता. जन्मापासून मृत्यूपर्यंत एकूण मुख्य असे सोळा संस्कार (षोडश संस्कार) मानले गेले आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे :
१) गर्भाधान २) पुंसवन ३) सीमन्तोन्नयन ४) जातकर्म ५) नामकरण ६) निष्क्रमण ७) अन्नप्राशन ८) चूड़ाकर्म ९) विद्यारंभ भूत संस्कार १०) कर्णवेध ११) यज्ञोपवीत १२) वेदारंभ १३) केशांत १४) समावर्तन १५) विवाह १६) अन्त्येष्टि.
याचबरोबर जगात कसे वागावे, मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, गुरु ऋण, देव ऋण, समाज ऋण, राष्ट्रऋण अशा परंपरा आणि विचार आहेत. यशस्वी जीवनाची व्याख्या करताना चार आश्रम १) ब्रह्मचर्याश्रम २) गृहस्थाश्रम ३) वानप्रस्थाश्रम ४) संन्यासाश्रम
आणि चार पुरुषार्थ
१) धर्म २) अर्थ ३) काम ४) मोक्ष यांची संकल्पना मांडली गेली आहे. व्यक्तिमत्व आणि चारित्र्य निर्माण यामध्ये संस्कारांचा आणि संस्कारविद्येचा फार मोठा वाटा आहे. योग्य संस्कार, नैतिकता आणि जीवनमूल्यांच्या आधारानेच भारतीय संस्कृती गेली हजारो वर्षे जीवित आणि नित्य प्रवाहित राहिली आहे.
आजच्या आधुनिक आणि गतिमान जीवनात मात्र संस्कारांची परंपरा जणूकाही दिसेनाशी झाली आहे असे वाटते. वैज्ञानिक प्रगती, यंत्र व्यवस्था, शीघ्र संवाद व्यवस्था यामुळे माणसाची भौतिक आणि ऐहिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते. मात्र कुठेतरी त्याच्या आंतरिक प्रवासामध्ये मोठी गडबड झाली आहे. तो एकाकी बनत चालला आहे. त्याचा इतरांबरोबरचा संवाद तुटत चालला आहे. तो सतत धास्तावलेला, शंकित आणि भ्रमांनी भयभीत असा बनला आहे. माहितीच्या अफाट पसाऱ्यामध्ये त्याचा परस्परांवरचा आणि स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. संस्कारांचा अभाव आणि संस्कृती, परंपरांपासून तुटलेली त्याची नाळ, मॉडर्न बनण्याच्या नादात त्याचा यंत्रावर आणि यंत्राधारित व्यवस्थांवर अधिक विश्वास आहे आणि परस्पर माणसांवरचा विश्वास कमी होत चालला आहे. विविध माध्यमे उदा. वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्या, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब त्याच्यावर सतत उलटसुलट माहितीचा भडीमार करीत आहेत. पारंपरिक जीवनमूल्ये आणि परंपरा उध्वस्त होताना दिसत आहेत. त्याचवेळी नव्याने अंगिकारलेली जीवनशैलीही बटबटीत, निरर्थक आणि व्यभिचारी असलेली अनुभवाला येत आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. एकूण समाजमानस अस्थिर आणि विसंवादी होत चालले आहे.
अशावेळी भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम या संस्थेने विश्व संस्कारविद्या परिषदेची स्थापना केली आहे. आपले, आपल्या मुलांचे आणि एकंदरीत वैश्विक समाजजीवन उत्तम संस्कारांनी समृद्ध व्हावे असे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संपूर्ण विश्वामध्ये संस्कार आणि नैतिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा; सुसंस्कारित – सद्गुणी – सदाचारी असा वैश्विक समाज निर्माण व्हावा यासाठी विश्व संस्कारविद्या परिषद काम करेल.
विश्व संस्कार परिषद - प्रमुख उद्दिष्टे
१) विविध प्रकारच्या संस्कार उपक्रमांबाबत ओळख निर्माण करणे, त्यांचा संग्रह करणे, त्यांचे प्रस्तुतीकरण करणे, त्यासंबंधी डॉक्युमेंटेशन करणे, त्याचा डाटा संग्रहित करणे इ.
२) समाजाच्या विविध स्तरांवरील उपक्रमांमध्ये संस्कार विषयक उपक्रम समाविष्ट केले जावेत यासाठी प्रयत्न करणे इ.
३) संस्कार आणि संस्कृती विषयक प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल कंटेंट निर्माण करणे इ.
४) संस्कार आणि नैतिक मूल्यांना समाजामध्ये पाठबळ निर्माण करून देणे इ.
५) विविध शाळा, महाविद्यालये, आस्थापने, सार्वजनिक संस्था इ. ठिकाणी संस्कार आणि नैतिकता याविषयी जागरुकता निर्माण करणे इ.
६) संस्कारविषयक कार्यशाळा, अधिवेशने आयोजित करणे इ.
७) विविध विद्यापीठांमध्ये संस्कार चेअर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे इ.
८) संस्कार प्रात्याक्षिके, संस्कार सोहळे आयोजित करणे इ.
९) संस्कारक्षम समाज आणि सुसंस्कारित विश्व निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे इ.