top of page

ओळख भारतीय राजांची 

भारतीय सभ्यता ही जगातील सर्वात प्राचीन आणि आजही प्रवाहित असलेली सभ्यता आणि जीवनपद्धती आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जीवित असलेली संस्कृती, परंपरा, सभ्यता म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यता आहे. तिला कोणी वैदिक संस्कृती म्हणतात, कोणी सनातन संस्कृती म्हणतात, कोणी हिंदू संस्कृती म्हणतात, कोणी एशियन आणि ओरिएन्टल म्हणतात तर कोणी इंडिक संस्कृती म्हणतात. भारतीय, वैदिक, सनातन, हिंदू, हिंदी, हिंदुस्तानी, इंडिक, ओरिएन्टल, एशियाटिक या सर्वांचा अर्थ एक आणि एकच आहे तो म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यता. तिची सुरुवात कधी झाली, त्याला किती काळ लोटला याविषयी निश्चित अंदाज करणे अशक्यप्राय आहे इतकी ती अनादी अनंत आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात पृथ्वीची उत्पत्ती इ. स. पू. ३००० वर्षे झाली अशी समजूत रूढ करण्यात आली होती. कारण बायबलमध्ये तसे लिहिले आहे. आजचे आधुनिक विज्ञान मात्र पृथ्वीची उत्पत्ती सुमारे दोन कोटीहून अधिक वर्षांपूर्वी झाली आहे असा अंदाज व्यक्त करीत आहे.

            भारतीय संस्कृती आणि परंपरा इतकी निरंतर आणि अव्याहतपणे कुठेही खंडित न होता हजारो वर्षे सुरु राहिली आहे. त्याचे कारण भारतीय समाजव्यवस्था आणि शासन व्यवस्था यामध्ये आहे. वेदकालीन वैदिक काळापासून भारतीय ऋषी मुनींनी माणसाच्या अंत:र्मनाचा आणि एकंदरीत व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी यांच्यातील संतुलनाचा सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी सृष्टीची अंगभूत व्यवस्था जी ऋतम् या नावाने ओळखली जाते ती जाणून घेतली होती. त्यातूनच ‘सर्वे भवन्तु सुखिनः’, ‘विश्वबंधुत्व’, ‘कृण्वन्तु विश्वम् आर्यम्’, इ. वैश्विक आदर्श संकल्पनांची निर्मिती झाली होती. त्यातूनच विकसित झाली होती भारतीय राजांची कल्पना : भारतामध्ये राज्यशासन व्यवस्थेमध्ये हजारो वर्षांमध्ये अनेक संकल्पना राबवल्या गेल्या. त्यात बदल होत गेले आणि ते काळानुरूप स्वीकारले गेले. त्यामध्ये आजच्या लोकशाहीशी मिळतीजुळती अशी गणराज्य संकल्पनेपासून ते रामराज्यासारख्या आदर्श राज्य व्यवस्थेपर्यंत अनेक प्रकारच्या व्यवस्था यशस्वीपणाने राबविल्या गेल्या. खरंतर आदर्श अशा समाजव्यवस्थेमध्ये ( उदा. सत्ययुगामध्ये ) राजा आणि शासन यांची गरजच नव्हती. कारण त्या व्यवस्थेमध्ये असणारे लोक अत्यंत सद्गुणी, समंजस आणि सदाचारी होते की ती व्यवस्था स्वयंव्यवस्थापनावर चालत होती.  तिथे व्यवस्थापन, शासन, दंडव्यवस्था याची कोणतीही गरज नव्हती. मात्र काळाच्या ओघामध्ये विविध युगांमध्ये समाजजीवन आणि लोकजीवन यामध्ये अनेक विसंगती आणि विकृती निर्माण झाल्या. त्यातून मग अधिकाधिक लोकांचे कल्याण साधणारी आणि समाजातील विकृतीवर – विचारांवर अंकुश ठेवणारी शासनव्यवस्था निर्माण होत गेली. त्याचा सर्वोच्च्य आविष्कार म्हणजे भारतीय राजा आणि राजाकेंद्रित शासनव्यवस्था. भारतीय इतिहास आणि पुराणांचा जर कोणताही पूर्वग्रह न ठेवता नीट अभ्यास केला आणि त्यावर संशोधन केले तर किमान इ. स. पू. एकतीस हजार वर्षांपासूनची भारतीय राजे, राजवंश, राज्यव्यवस्था यांची शृंखलाबद्ध माहिती मिळते. सूर्यवंश आणि चंद्रवंश याचबरोबर विकसित झालेले अनेक राजवंश आणि त्यांच्या परंपरा यांचा विस्तृत अभ्यास केला तर आपण आश्चर्यचकित होतो. यामध्ये वैदिक काळापासून देवांचा राज इंद्र, सुदास, मनू, पृथू, नहुष, रघु, दिलीप, नल, ययाती, श्रीराम, श्रीकृष्ण, जनमेजय, इ. शेकडो वैदिक आणि पौराणिक राजांच्या विलक्षण कथा दृष्टीस पडतात. त्याचबरोबर ज्याला आपण ऐतिहासिक राजे म्हणतो अशा नंद, मौर्य, शृंग, गुप्त, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, चोल, होयसळ, पल्लव, काश्मिरी नरेश, मगध, विजयनगर, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, पहिला बाजीराव, अहोम राजे इ. शेकडो राजांची अशी त्यांच्या भव्यदिव्य पराक्रमांची माहिती आपल्याला मिळते. यामध्ये अनेक राजे हे महाराजे होते, सम्राट होते, त्यांनी फार मोठी साम्राज्ये स्थापन केली. कल्पनातीत असे ऐश्वर्य संपादन केले आणि ते सर्व समाजामध्ये वाटून टाकले. सर्वसामान्य नागरिकांच्या सुखासाठी ते अविरतपणे झटले आणि त्यांनी पराक्रमाबरोबरच उदारतेचे उत्तुंग आदर्श निर्माण केले.  दुर्दैवाने या अतिशय भव्य, दैदिप्यमान आणि गौरवशाली राजे, सम्राट आणि राज्य परंपरांचा समावेश भारतामध्ये अभ्यासक्रमामध्ये केला गेला नाही. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि इतर माध्यमातून भारतीयांना खऱ्या भारतीय इतिहासाची ओळखच करून दिली गेली नाही. याउलट तो विकृत करून सांगण्यात आला. भारतीय लोक हे कायम पराजित होत राहिले आणि बाहेरच्या जगातून विविध ख्रिश्चन आणि मुस्लीम आक्रमकांनी येथे येऊन स्थानिकांचा पराभव केला आणि इथे राज्य प्रस्थापित केले. भारतीय सभ्यता आणि संस्कृती ही जंगली आणि साप खेळवणाऱ्या गारुड्यांची सभ्यता होती असा अभद्र प्रचार केला गेला आणि तेच शिकवण्यात आले, तेच भारतीय समाजमनावर बिंबवण्यात आले. संपूर्ण इतिहासात मोगल आणि इंग्रजी आक्रमकांचेच गोडवे गायले गेले. नाही म्हणायला छ. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, अहोम राजे, श्रीराम, श्रीकृष्ण यांचा ओझरता उल्लेख केला गेला. हे सर्व कुणी केले, का केले, त्यांचा उद्देश काय होता यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही. भविष्यातील भारताला विशेषतः युवा पिढीला गौरवशाली आणि पराक्रमी भारतीय राजे आणि सम्राट यांची ओळख करून देणे हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे अत्यंत शूर, वीर आणि वैभवशाली राजांचे आपण वारस आहोत असा स्वाभिमान त्यांच्यामध्ये जागृत होईल. त्यातून त्यांना विलक्षण अशी प्रेरणा मिळेल. त्यांनाही संपूर्ण जगात आपापल्या क्षेत्रात पराक्रम गाजवण्याची स्फूर्ती मिळेल असा विश्वास वाटतो.

            भारतीय राजा आणि राज्यव्यवस्था यामध्ये राजाला विष्णूचा अवतार मानले आहे. त्याला देवत्वाचा दर्जा दिला आहे. आर्य चाणक्य अर्थात कौटिल्याने त्यांच्या कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राजा, शासनव्यवस्था, राजाचे गुण, सामरिक कौशल्ये इ. बाबत विस्तृत विवेचन करून ठेवले आहे. प्रजा म्हणजे राजाची लेकरे असून राजा हा सर्वांचा पिता आहे. राज्यातील प्रत्येक प्रजाजनाची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. कोणताही नागरिक केव्हाही जाऊन थेट राजाची भेट घेऊ शकत असे आणि आपली दुःखे, समस्या राजाला सांगू शकत असे. आदर्श राज्य म्हणजे रामराज्य अशी प्रभू श्रीरामाच्या वेळची राज्यव्यवस्था ही आदर्श राज्यव्यवस्था समजली जात असे. अर्थात सगळेच राजे श्रीरामांसारखे उत्तम आणि आदर्श राजे झाले नाहीत. राज्य व्यवस्थेची अतिशय वाईट उदाहरणेही आपल्याला पाहायला मिळतात. मात्र त्यातूनही सद्गुणांचा गुणाकार करणे आणि वाईट गुणांचा त्याग करणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असते.

प्राचीन भारतीय राजांचा आणि सम्राटांचा अभ्यास करून, त्यांचे विषयी माहिती घेऊन त्यांच्या नेतृत्व गुणांचा, धाडसाचा, पराक्रमाचा, मुत्सद्देगिरीचा आणि सद्गुणांचा अंगीकार आपल्या जीवनात करायचा हा “ओळख भारतीय राजांची” कार्यशाळा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

bottom of page